साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून सृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) या तरूणीने बुधवारी रात्री आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टर जयश्री जकाते, प्राचार्य एस. टी. साळुंखे आणि हॉस्टेल कमिटी सदस्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीचे वडिल भानुदास बिरामणे यांनी फिर्याद दिली आहे.
हॉस्टेलमधील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वॉशरूमची दुरवस्था आणि सुरक्षेच्या त्रुटींविरोधात तिने आवाज उठवला होता. हॉस्टेलमधील गैरसोयींबाबत आवाज उठवल्यानंतर सृष्टीवर मानसिक दबाव आणल्याचा, धमकी दिल्याचा आणि तिचा जबरदस्तीने व्हिडिओ काढल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हॉस्टेलच्या बाथरूममध्ये एक पत्रही चिकटवले होते. या कारणावरून रेक्टर जयश्री जकाते तिच्यावर सातत्याने दबाव आणत होत्या, असा सृष्टीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
‘तुला कॉलेजमधून काढून टाकणार आणि पोलिसांत तक्रार करणार’, अशी धमकी देऊन हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांनी २ सप्टेंबर रोजी तिच्याकडून जबरदस्तीने कबुली जबाबाचा व्हिडिओ काढला होता, असा दावा देखील कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे मानसिक दबावाखाली येऊन सृष्टीने हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल. हॉस्टेलमधील या गैरसोयींकडे व परिस्थितीकडे प्राचार्य एस. टी. साळुंखे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचेही भानुदास बिरामणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे हेड क्वार्टर असलेल्या साताऱ्यातच प्राचार्यांसह रेक्टर आणि कमिटी सदस्यांवर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याची माहिती असून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. जबाबांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पालकांना न बोलावता मुलीवर दबाव का आणला? तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी तिच्यावर कारवाईची भाषा का करण्यात आली? घटनेनंतर प्रशासनाची भूमिका काय होती? या प्रश्नांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सृष्टीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या हॉस्टेलमधील १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. रयत शिक्षण संस्थेने देखील तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. घटनेनंतर वसतिगृह रेक्टरला संस्थेने रजेवर पाठविले. सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी संस्था पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. के. मस्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच दक्षता म्हणून वसतिगृहाच्या इमारतीला संरक्षक जाळी बसविण्यास सुरूवात केली आहे.
