कराडनजीकच्या मलकापूर शहरात रविवारी मध्यरात्री कोयत्याने वार करून एका तरूणाची पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर हत्या करण्यात आली. आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाने मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली आहे. सुनील नाथा चव्हाण (रा. चाफळ, त. पाटण), असे मृताचे नाव आहे. हत्या करून पळून गेलेल्या सूरज दीपक चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) आणि त्याचा मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे (रा. कोरेगाव, ता. सातारा) यांना साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. मृत आणि मुख्य संशयित आरोपी हे एकाच गावचे असून एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे पाटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
यासंदर्भात घटनास्थळ आणि कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनिल चव्हाण आणि मुख्य आरोपी सूरज चव्हाण हे एकाच गावातील रहिवासी आहेत. त्यांची घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. सुनिल चव्हाण याचे गेल्या दोन वर्षापासून सूरज चव्हाणच्या आईसोबत अनैतिक संबध होते. दोघांच्या संबंधाची माहिती घरातील लोकांना समजली होती. त्यामुळे संबंधित महिलेला दुसऱ्या गावी ठेवण्यात आले होते. तरीही ती सुनिलला संपर्क करत होती. ही बाब तिच्या मुलाला खटकत होती.
आरोपी दबा धरुन बसले अन् सुनीलला लाहोटीमध्ये अडवले
आईशी असलेल्या संबंधामुळे सूरजच्या मनात प्रचंड राग होता. सूरजने मित्राच्या साथीने सुनिलचा काटा काढायचा कट रचला. कराडमधील पिझ्झा हटमध्ये सुनील जॉब करत असल्याची माहिती संशयित आरोपींना होती. म्हणून रविवारी रात्री नऊ वाजताच कराडात येऊन आरोपी दबा धरून बसले होते. रात्री एकच्या सुमारास जॉबवरून सुटल्यानंतर सुनील हा मलकापूरला निघाला असताना सूरज आणि त्याचा मित्र अक्षय या दोघांनी सुनीलला लाहोटीनगरमध्ये अडविले.
पोलिसांकडून आरोपीला बेड्या
दोन्ही आरोपींनी सुनीलवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. डोक्यात आणि शरीरावर कोयत्याने वार करून त्याची मध्यरात्री निर्घृण हत्या केली. त्यानंतर दोघेही कारमधून साताऱ्याकडे पळून गेले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे गतिमान करत संशयीतांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
