नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले.
प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता
स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन परिवहनमंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
पाच ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा
स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी. संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी. पाच ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
परिवहन आयुक्त कार्यालयात झाली बैठक
रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियमांचे पालन करावे. नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर,रिक्षा-टॅक्सीयुनियनचे नेते शशांक राव उपस्थित होते.
