गणेशोत्सवापूर्वीच दिवाळीचा फराळ ;ठाणे डोंबिवली शहरांतून सीमेवरील सैनिकांना दिवाळीनिमित्त फराळ पाठवण्याचा उपक्रम, यंदा आठवे वर्ष

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे आणि डोंबिवली शहरांतून सीमेवरील सैनिकांना दिवाळीनिमित्त फराळ पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. अतिशय दुर्गम भागातील सीमेवरील चौक्यांपर्यंत फराळ व्यवस्थित पोहोचावा, म्हणून त्याचे नियोजन सुरू झाले आहे. डोंबिवलीतील नमस्ते शौर्य फाऊंडेशनतर्फे यंदा १२ हजार, तर ठाण्यातील नाना साठे प्रतिष्ठानतर्फे दोन हजार सैनिकांना फराळाचे संच पाठवले जाणार आहेत.

सैनिकांप्रती कृतज्ञता

दिवाळीचा आनंद साजरा करत असताना देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो. डोंबिवलीतील नमस्ते शौर्य फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने गेली आठ वर्षे सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो.

यंदा आठवे वर्ष

या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या सीमावर्ती भागांतील सैनिकांना फराळाचे संच दिले जातात. यंदा तवांग (अरुणाचल प्रदेश), कुपवाडा (काश्मीर), जम्मू, द्रास (कारगिल) आणि सियाचेन येथील १२ हजार सैनिकांपर्यंतदिवाळी फराळपोहोचविण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे. त्याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. चकली, चिवडा आणि पौष्टिक लाडू या पदार्थांचा फराळ संचात समावेश आहे.

हजार जवानांना फराळ पाठवला जाणार

ठाण्यात नाना साठे प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ पाठवला जातो. गेली सलग तीन वर्षे संस्था हा उपक्रम राबवत असून यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. संस्थेतर्फे यंदा सहा ते सात सैनिकी तळांवरील दोन हजार जवानांना फराळ पाठवला जाणार आहे.

श्रमदान

विशेष म्हणजे हे दोन्ही उपक्रम लोकसहभागातूनराबवले जातात. दर वर्षी या उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. नागरिक यथाशक्ती देणगी देतातच; परंतु फराळाचे संच भरणे, ते विशिष्ट ठिकाणी पोहोचवणे आदी कामांसाठी श्रमदानही करतात.

संपर्क : नाना साठे प्रतिष्ठान : कौस्तुभ साठे- ९८३३१०९३९८

नमस्ते शौर्य फाउंडेशन : कुणाल सुतावणे- ९८१९५०४०२०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *