सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावत आलेल्या पुण्याच्या संजय कदम (वय ६५) यांच्या आयुष्याची शर्यत मात्र रविवारी बोगदा परिसरातच थांबली. धावताना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर त्यांच्यावर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली; मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. स्पर्धेदरम्यान धावपटूचा मृत्यू झाल्याने आयोजक, सहभागी धावपटू आणि सातारकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संजय कदम यांना बोगदा परिसरात त्रास जाणवताच त्यांच्या मागून धावत असलेले डॉ. मुजावर, प्लस हॉस्पिटलचे डॉ. कौशिक पाटील आणि मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रतापराव गोळे त्यांच्या मदतीला धावले. रुग्णवाहिका येईपर्यंत सीपीआर देत त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेतही उपचार सुरू ठेवण्यात आले.
प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर संजय कदम यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. संग्राम देशमुख, डॉ. ओंकार पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर प्रकृती स्थिर झाली होती. मात्र, काही तासांनी कदम यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने सातारा हिल हाफ मॅरेथॉनवर शोककळा पसरली.
संजय उर्फ तानाजी शामराव कदम हे मूळचे पाटण तालुक्यातील कड़वे बुद्रुक गावचे रहिवासी होते. ते सेवानिवृत्त शास्त्रज्ञ होते. काही वर्षांपासून सहकुटुंब पुण्यात स्थायिक होते. ते धावण्याचा दररोज सराव करत असत. रविवारी ते सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. परत येत असताना बोगदा परिसरात त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, बहीण, दोन भाऊ, असा परिवार आहे.
