ठाण्यात सायबरलुट फोफावली ;३५१ गुन्ह्यांत तब्बल ८४ कोटींची लुट , ऑनलाइन फसवणुकीने गाठला उच्चांक

शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल’, अशा आमिषापासून ते ‘फसव्या लिंक’, ‘एपीके फाइल’, ‘बनावट संदेश’ पाठवून, तसेच ‘मोबाइल हॅकिंग’, ‘डिजिटल अटकेची’ भीती दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत.

फसवणुकीचे ३१५ गुन्हे

यंदा ठाणे पोलिस आयुक्तालयात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीप्रकरणी दाखल झालेल्या ३५१ गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांनी तब्बल ८४ कोटी रुपयांची लुबाडणूक केली आहे. या गुन्ह्यांपैकी अवघे ८ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ९५ गुन्हे शेअर मार्केट , गुंतवणूक, बचत आणि पॉलिसीशी संबंधित आहेत. या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कमही सर्वाधिक, म्हणजे ३३ कोटी रुपये आहे.

ऑनलाइन फसवणुक

या टोळ्या नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यातीलपैशांवर डल्ला मारतात. दुसरीकडे, गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने सायबर गुन्हेगारी अधिकच फोफावली आहे. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वांनाच गुन्हेगार लक्ष्य करत आहेत.

‘डिजिटल अटक’

काही प्रकरणांत ‘डिजिटल अटक’ केल्याची भीती दाखवली जाते. तर, तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याच्या भूलथापा मारून ऑनलाइन माध्यमातून नागरिकांकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत.

२५ आरोपींना अटक

ऑनलाइन फसवणुकीसंदर्भात दाखल झालेल्या ३५१ गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ८४ कोटी १३ लाख ४५ हजार रुपये आहे. या गुन्ह्यांपैकी २८ गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी २५ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे ८ टक्के असून, काही प्रकारांतील ऑनलाइन फसवणुकीच्या एकाही गुन्ह्याची उकल झालेली नाही.

 

शेअर मार्केट, पॉलिसीशी संबंधित गुन्हे जास्त

एकूण ३५१ गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक नोंद झालेल्या शेअर मार्केट, गुंतवणूक, बचत आणि पॉलिसीशी संबंधित ९५ गुन्ह्यांत ३३ कोटी १० लाख रुपयांची सायबर लूट झाली आहे. या गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे, म्हणजे ८.४२ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. फसवणूक, फिशिंग कॉल, एसएमएस आणि लिंकशी संबंधित गुन्ह्यांची संख्या ७२ असून, या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ३० कोटी ५३ लाख रुपये आहे. यापैकी केवळ दोन गुन्हे उघडकीस आले असून, हे प्रमाण २.७७ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *