प्लास्टिकविरोधी कारवाईला वेग, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंडाची तरतूद ; कारवाईसाठी मनुष्यबळ पडतंय कमी

प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर आणि साठवणूक करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाही मुंबईतील प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाही.

गोडाऊनधारकांवर कठोर कारवाई

त्यामुळे व्यापारी, दुकानदार आणि फेरीवाल्यांसह मोठ्या गोडाऊनधारकांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दुकाने व आस्थापना विभागाला दिले आहेत. मात्र, कारवाईसाठी आवश्यक १२७ मंजूर पदांपैकी केवळ ५३ पदे कार्यरत असल्याने विभागासमोर मनुष्यबळाचे मोठे आव्हान आहे.

पाणी तुंबण्याची समस्या

फेरीवाले, व्यापारी आणि दुकानदारांबरोबरच ग्राहकांकडूनही प्लास्टिकचा वापर केला जातो. सणासुदीत त्याचे प्रमाण आणखी वाढते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होण्यास प्लास्टिक कारणीभूत ठरते. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते.

कारावासाचीही तरतूद

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर, साठवणूक किंवा वितरण करणाऱ्याला पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांच्या कारावासाचीही तरतूद आहे. तरीही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर सुरूच आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुरानंतर प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र, आजही खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या वेष्टनातून दिले जात असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे.

येत्या काही दिवसांत कारवाई सुरू

नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दुकाने व आस्थापना विभागाला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. फेरीवाले, दुकानदार आणि गोडाऊनधारकांविरोधातील कारवाई येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात सुरू केली जाणार आहे.

विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता

मात्र, विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. वरिष्ठ निरीक्षकांची ३३ आणि निरीक्षकांची ९४ अशी एकूण १२७ मंजूर पदे आहेत. त्यापैकी २० वरिष्ठ निरीक्षक आणि ३३ निरीक्षक कार्यरत असून ७४ पदे रिक्त आहेत. यामध्ये निरीक्षकांची ६१ पदे रिक्त आहेत.

यासंदर्भात दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी अनाजी माने यांनी सांगितले की, मनुष्यबळ कमी असले तरी वॉर्डस्तरावर अन्य विभागांचे मनुष्यबळ घेऊन प्लास्टिकविरोधी कारवाई केली जाते.

अतिरिक्त पदे भरण्याची कार्यवाही

आता विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांच्या आदेशानुसार आणि महापालिका उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी कठोर कारवाई केली जाईल. त्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार असून, मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता अतिरिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *