ठाणे ते पनवेल मार्गावर धावणार पहिली ए.सी. लोकल

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना हुलकावणी देत मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणारी पहिली वातानुकूलित लोकल मुख्य आणि हार्बर मार्गाला बगल देत थेट ट्रान्सहार्बर मार्गावर धावणार आहे. त्यामुळे कोंदट गाडय़ांमुळे गुदमरलेल्या ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यामुळे हा प्रवास येत्या काळात गारेगार होणार आहे.

चेन्नईतील रेल्वेच्या कोच फॅक्टरीत (आयसीएफ) या लोकलचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी ही लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणार होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ही लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने अधिक वेळ न घालवता ही लोकल लवकरात लवकर ताफ्यात दाखल करण्यासाठी हालचाली सुरूकेल्या आहेत.

त्यानुसार मध्य रेल्वेचेमहाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी चेन्नईतील आयसीएफ कारखान्याला भेट देऊन या लोकलची पाहणी केली. ही लोकल ६ ते ७ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिने सुरक्षेसंदर्भातील चाचण्या घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट दराचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यानुसार चर्चगेट ते वांद्रे १२० ते १३० रुपये आणि चर्चगेट ते बोरिवली या अंतरासाठी १७० ते १९० रुपये दराचा प्रस्ताव ठेवला आहे. तर मासिक पास ५ ते ६ हजार रुपये असावा, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे ते पनवेल हा मार्ग निश्चित केला आहे. मात्र तिकिटांचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, इतर मार्गाच्या तुलनेत ठाणे ते पनवेल या मार्गावर प्रवाशांची गर्दी कमी असल्याने या मार्गावर ही लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *