लाहोर स्फोटात 72 जणांचा मृत्यू

ईस्टरनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शनिवारी रात्री दहशतवाद्याने घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात महिला आणि लहान मुलांसह 72 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाची माहिती मिळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भात चर्चा झाली.

लाहोरमधील प्रसिद्ध गुलशन ए इक्‍बाल बागेत मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती नागरिकांची उपस्थिती असलेला हा कार्यक्रम सुरू होता. या स्फोटात किमान दोनशे नागरिकही जखमी झाले आहेत. अपघाताचे ठिकाण पाकिस्तानमधील उच्चभ्रू वस्तीत आहे. बागेत ईस्टरनिमित्त बहुसंख्येने ख्रिस्ती नागरिक उपस्थित होते. या वेळी एका दहशतवाद्याने बागेच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आत्मघाती स्फोट घडवून आणला. पाकिस्तानच्या इतर शहरांच्या तुलनेत शांत असलेल्या लाहोरमध्येच हा स्फोट झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दहशतवादी संघटनांनी आम्ही लाहोरमध्ये घुसलो असल्याचा संदेश दिला आहे. या संदेशाची पोलिस चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *