कन्हैया कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने आज (मंगळवार) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
 
दिल्लीतील तुघलक लेनवर राहुल गांधी यांचे निवासस्थान आहे. आज सकाळी या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी कन्हैया कुमारसह जेएनयूएसयू संघटनेचे पदाधिकारी, तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (एआयएसएफ)चे नेतेही उपस्थित होते. कन्हैयाची जामीनावर मुक्तता झाल्यानंतर प्रथमच यांची भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
 
जेएनयू कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैयावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. कन्हैयाला न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. कन्हैयाने सुटकेनंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *