दुचाकीच्या धडकेत जखमी होऊन मेंदूचे कार्य थांबलेल्या एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे. अवयवदानाबद्दल जनजागृती झाल्यामुळेच अनेक जण यासाठी पुढाकार घेत असून शहरात प्रथमच एका महिलेचे अवयवदान करण्यात येणार आहे.
मंदाबाई गडवे (वय ५५) या शुक्रवारी (ता.१८) सकाळी सिडको एन-सहा परिसरात मॉर्निंग वॉकला जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्टरांनी सोमवारी (ता.२१) नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक तपासण्या करून मागणीनुसार अवयव देण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी रक्ताचे नमुने मुंबई येथे तातडीने पाठविण्यात आले. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास या प्रक्रियेस सुरवात होईल.
मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयात यकृत, एमजीएम रुग्णालयात एक किडनी, तसेच शहरातील अन्य एका रुग्णालयातील रुग्णास दुसरी किडनी देण्यात येईल. तसेच दोन्ही डोळ्यांचे एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपण केले जाईल. मंदाबाई यांना प्रदीप, विजय, दिलीप ही मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दुपारपासून एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांची लगबग वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णाच्या रक्त, रक्तदाब अशा तपासण्या सुरूच होत्या. कुटुंबीयांनी सर्वच अवयव देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या हदयाला एक ब्लॉकेज आढळल्याने हदय पाठविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. सर्व अवयव वेळेत पोहोचावेत, यासाठी ग्रीन कॉरिडॉर असणार आहे.
मेंदूचे कार्य थांबले असल्याने आमची आजी लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. त्या ब्रेनडेड असल्याचे सांगत डॉक्टरांनी समुपदेशन केले. त्यानुसार आम्ही अवयवदान करण्याची मानसिक तयारी केली. आजीमुळे कुणाचे तरी जीव वाचत आहेत, ही भावना मोठी असली तरी ती नसल्याचे दु:ख आहेच.