प्रसारमध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्रुसेल्सच्या झावेनतेम विमानतळावरील डिपार्चर हॉलमध्ये दोन मोठे बॉम्ब स्फोट झाले. या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण समजू शकलेले नसले तरी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विमानतळावर स्फोटावेळी अनेक प्रवासी उपस्थित होते. यामध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला असून परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. शिवाय, पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मेट्रो स्टेशनवरही स्फोट झाला आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्फोटाची छायाचित्रे ट्विटर व फेसबुकवर अपलोड करण्यात आली आहेत.