मुंबईतील उद्यानांत प्लास्टिक पिशव्यांना बंदी

मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तर उद्यान आणि मनोरंजन मैदानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उद्यान आणि मनोरंजन मैदानांमध्ये प्लास्टिक पिशव्या नेण्यास बंदी घालण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर केले. यासंदर्भात उद्यान विभागाला सूचना करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील खेळाच्या मैदानांमध्ये लहान मुलांची खेळणी, जॉगर्स पार्क आदी थीमपार्क बनवण्यात येत आहे. त्यामुळे मैदाने कमी होत आहे. त्यामुळे तरुण पिढीला मनसोक्तपणे आपल्या आवडत्या खेळाचा आनंद लुटता यावे, खेळता यावे, यासाठी कबड्डीसह क्रिकेट आणि फुटबॉलसाठी जास्तीत जास्त मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त मेहता यांनी स्पष्ट केले. कबड्डीसाठी ६७ मैदाने ही विकसित केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील मैदानांमध्ये कबड्डींसाठी अधिक मैदाने राखीव ठेवण्यात यावीत आदी सूचना विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेत केवळ कबड्डीच नव्हे तर क्रिकेट आणि फुटबॉलसाठीही मैदाने उपलब्ध व्हावीत, ही माझीही इच्छा आहे. त्यामुळे या मैदानी खेळांसाठी अधिकाधिक मैदाने निश्चित उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या खेळण्यांचा मोठय़ांकडून वापर झाल्यास कारवाई

उद्यान व मनोरंजन मैदानांत छोटय़ा मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवली आहे. परंतु याचा ब-याचवेळा वापर मोठय़ा माणसांकडून होत असल्याचा तक्रारी आहेत. त्यामुळे मोठय़ा माणसांकडून खेळण्यांचा वापर होताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुत मेहता यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *