अलिबागचे आमदार पंडित पाटील यांच्या गाडीने धडक दिल्याने एका सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय राऊत (६५) असे सायकलस्वाराचे नाव आहे. सुदैवाने आमदार पंडित पाटील यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.
चौल बीबी येथे राहणारे दत्तात्रय राऊत हे सायकलवरून आपल्या घरी जात होते. आमदार पंडित पाटील यांची गाडी वावेमाग्रे चौलच्या दिशेने जात होती. सकाळी साडेदहा वाजता ही गाडी चौल बीबी येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुढे चाललेल्या सायकलला गाडीने मागून धडक दिली. या अपघातात सायकलस्वार दत्तात्रय राऊत गंभीर जखमी झालेले. दत्तात्रय राऊत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच जिल्हा रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर स्थानिक रहिवासी गोळा झाले होते. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आमदार पंडित निघून गेले..
अपघात झाला तेव्हा आमदार पंडित-पाटील गाडीत होते. अपघातात जखमी झालेल्या दत्तात्रय राऊत यांना तातडीची मदत न करता आमदार पंडित-पाटील दुस-या वाहनाने तेथून निघून गेले. असे प्रत्यक्षदíशनी सांगितले. या प्रकरणी आमदार पंडित-पाटील यांच्या गाडीचा चालक किरण किशोर पाटील याच्या विरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.