घर वेळेत बांधून न दिल्याच्या कारणावरून एका बिल्डरला चक्क 10 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सुरेश पाटील असं बिल्डरचं नाव असून तक्रारदार देविदास भरसट यांनी दाखल केलेल्या खटल्यावरून नाशिक ग्राहक न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
देविदास भरसट यांनी रो हाऊससाठी 1 लाख 10 हजारांची रक्कम बिल्डर सुरेश पाटील यांना दिली होती. पण बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यानं भरसट यांनी बिल्डर सुरेश पाटील यांच्याकडे रक्कम परत मागितली. मात्र तो टाळाटाळ करत होता.
या सर्व प्रकाराला वैतागून देविदास यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायलयाने पाटील यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले. मात्र बिल्डर पाटील यांनी पैसे परत केले नाहीत.
न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या पाटील यांना मग ग्राहक न्यायालयाने दणका दिला. सुरेश पाटील यांना दोषी ठरवत आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने देविदास भरसट यांची बाजू ग्राह्य मानत, बिल्डरला थेट 8 महिन्यांचा कारावास सुनावला. याशिवाय न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणावरून अतिरिक्त 2 महिन्यांचा कारावास सुनावला.
घर देण्यात दिरंगाई केल्याच्या कारणावरून वर्षभराच्या कारावासाची शिक्षा होण्याची ही घटना दुर्मिळ मानली जात आहे.