हुंडा का घ्यावा लागतो?

एक साधा प्रश्न.

एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे

तरणेताठे मुलगे लग्नात

मुलीकडून हुंडा का घेतात?

‘आॅक्सिजन’ला आलेली

पत्रं आणि ई-मेल्समध्ये

बारीक नजरेनं शोधून पाहिलं,

तर सापडतात

चक्रावून टाकणारी

काही उत्तरं

मुलीकडच्यांना शहरातलाच पोरगा हवा,

तोही शक्यतो सरकारी नोकरीवाला.

त्यातही पोलिसांत, महसूल खात्यात,

एरिगेशनवाला असेल तर सोन्याहून पिवळं.

नाहीतर बॅँक/एलआयसी त्यातल्या त्यात बरं,

अशी पोरं गाठायची म्हणून मुलींचे वडील

पैशाच्या पोत्यांची तोंडं उघडतात

आणि जास्त हुंडे देऊन का होईना

सुपारी फोडतात.

शहरी/नोकरीवाला मुलगाच पाहिजे,

हा आग्रह हुंड्याच्या रकमा वाढवतो आहे.

हुंडा नको असं म्हणणाऱ्या मुलाला

खेड्यापाड्यात कुणी मुलगी देत नाहीत,

असाही अनुभव येतो म्हणतात.

कारण ‘अशा’ मुलाबद्दल शंका येतात.

याचं आधी लग्न झालेलं असलं पाहिजे,

काहीतरी शारीरिक दोष असणार,

काहीतरी कमी असणार असं म्हणत

मुलींचे वडील हुंडा नको म्हणणाऱ्यांना

बाहेरचा रस्ता दाखवतात.

‘शिक्षण संस्था, बॅँका,

खासगी कंपन्यांमध्ये मुलाला

पर्मनण्ट नोकरी मिळेल, त्यासाठी

फक्त काही लाख द्या,

पगार तर काय मरेपर्यंत तुमची मुलगीच खाणार,’

असं म्हणत मुलीच्या वडिलांकडून

काही लाख घेतले जातात.

ते दिलेही जातात,

पुन्हा कारण तेच, शहरी-नोकरीवाला मुलगा हवा.

आपण किती हुंडा घेतला,

हे सांगणंच नव्हे तर

आपण किती हुंडा दिला हे सांगणंही समाजात

सध्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे.

थेट रोख रकमेचा हुंडा आता मागितला जात नाही,

त्याऐवजी आलिशान लग्न, दागिने, गाड्या, घर,

नोकरीसाठी पैसा ते देश-विदेशातील हनिमून पॅकेज

या स्वरूपात देवाणघेवाण होते आहे.

घरच्या मुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करून

हुंडा दिलेला असतोच, त्याची भरपाई म्हणून

मुलांच्या लग्नात हुंडा घेणं हे जनमान्य!

‘दिला, मग घ्यायचा का नाही?’

– हे तर्कट सांगून नव्या विचारांच्या

मुलांना हुंड्यासाठी तयार करून

इमोशनल ब्लॅकमेल करण्याचंही प्रमाण

बरंच मोठं असावं, असं ही पत्रं सांगतात.

अनेक मुलांना हुंडा ही आपल्या

गुणवत्तेची सामाजिक पत आहे असं वाटतं.

जितका हुंडा जास्त,

तितका आपल्याला समाजात मान जास्त,

असं त्यांचं मत बनतं आहे.

हुंड्यापायी होणारा छळ पाहून मुलींचा हुंड्याला विरोध असतो,

पण तो विरोध व्यक्त केला तर आपलं लग्न

कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती मोठी असते.

घरच्यांचा धाक आणि हुंडा देऊन,

लग्नाचा खर्च करण्याची अपरिहार्यता.

कर्ज काढून, शेती विकून लग्नासाठी पैसा उभा करणारे

हतबल वडील पाहून

अनेकींना मनस्वी त्रास होतो.

त्याउलट वडिलांनी आपलं लग्न थाटामाटात करून द्यायला हवं,

सगळा संसार, दागदागिने, हवी ती वस्तू द्यायलाच हवी,

तो आपला हक्कच आहे, असं वाटणाऱ्याही काही मुली

या पत्रांमध्ये भेटतात.

हुंडा घेऊ नये,

हुंडा ही अत्यंत वाईट परंपरा आहे, यावर

वैचारिक एकमत म्हणावं इतकी सहमती आहे.

मात्र तो ‘नाईलाज’ म्हणून घ्यावा लागतो,

असा बहुसंख्य तरुण मुलांचा सूर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *