वृत्तवाहिनीवरील चर्चेचे सूत्रसंचालन करणे एका लोकप्रिय मल्याळम निवेदिकेला चांगलेच महागात पडले. महिषासूर जयंतीबद्दल चर्चा करताना दुर्गादेवीचा अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांना 2000 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोबाईलवर शिवीगाळ केली.
‘महिषासूराची जयंती साजरी करणे देशद्रोह मानला जाऊ शकतो का‘ या विषयावर टीव्हीवरील एका कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी दुर्गादेवीला ‘वेश्या‘ म्हटल्याबद्दल त्यांना विविध हिंदुत्ववादी गट, संघटनांचे समर्थक व कार्यकर्त्यांकडून एशियानेट न्यूज टीव्हीच्या सिंधू सूर्याकुमार यांच्या मोबाईलवर शिवीगाळ करणारे 2000 कॉल आल्याचे सूर्याकुमार यांनी सांगितले.
सिंधू यांचा मोबाईल क्रमांक काही व्हॉट्सऍप समूहांमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना मोबाईलवरून शिवीगाळ करण्यास सुरवात झाली.
त्या म्हणाल्या, “मला प्रत्येक मिनिटाला कॉल येत आहेत. मी दुर्गेचा अवमान केल्याचा त्यांचा आरोप आहे. अनेकांनी मला वेश्या म्हटले. त्यातील अनेकजणांना काहीही माहीत नव्हते तरीही ते शिव्या देत होते.”
याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.