वऱ्हाड घेऊन जाणारी बोट उलटली

वऱ्हाड घेऊन जाणारी बोट उलटली

वसईजवळच्या पाणजू बेटावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बोट नायगाव खाडीकिनारी उलटून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत एक जण मृत्युमुखी पडला, तर २१ जण जखमी झाले. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या बोटीत बसल्याने ही दुर्घटना घडली. किनाऱ्यावरच बोट कलंडल्याने मोठी जीवितहानी टळली.

पाणजू गावात रविवारी दोन लग्ने होती. उमेळमान दीपेश पाटील याचे जयवंत भोईर यांची मुलगी निशा भोईर हिच्याशी रविवारी दुपारी लग्न होते. रवींद्र भोईर यांच्या मुलीचे मयूरीचे लग्न संध्याकाळी होते. पाणजू गाव बेटावर असल्याने बोटीतून गावात जावे लागते. वऱ्हाडींची संख्या जास्त असल्याने वधूपित्यांनी रेती वाहून नेणाऱ्या बोटींची वऱ्हाडासाठी व्यवस्था केली होती. या बोटीची क्षमता तीस प्रवाशांची आहे, मात्र त्यात सत्तर ते ऐंशी जणांना बसविण्यात आले. किनाऱ्यावर अडीचशे ते तीनशे वऱ्हाडी थांबले होते. सव्वाअकराच्या सुमारास सुहास पाटील यांचे वऱ्हाडी बोटीत चढू लागले. त्यांचे वजन जास्त झाल्याने बोट पाण्यात उलटली. अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी पोहोचले. स्थानिकांनी पटापट पाण्यात उतरून बुडणाऱ्या लोकांना वाचविण्यास सुरुवात केली. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या होत्या. पाण्यात पडलेल्या २१ जणांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु, बाबाजी म्हात्रे (६१) या वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते उमेळमान गावचे रहिवासी होते. जखमींपैकी दहा जणांना पालिकेच्या पेटिंट रुग्णालयात. तिघांना नालासोपाऱ्याच्या अलायन्स रुग्णालयात तर नऊ जणांना बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच जण अत्यवस्थ असून, त्यात तीन लहान मुलींचा समावेश आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत. घटनेनंतर सुहास पाटील यांचे लग्न साधेपणाने उरकण्यात आले. तर संध्याकाळचे मयूरी भोईर हिचे लग्नही साधेपणाने उरकरण्यात आले. या वेळी वऱ्हाडींची ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *