मध्य प्रदेशातील शाजापूर येथे बुधवारी सायंकाळी वाळू माफियांनी महिला पोलिस अधिकाऱ्यासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजापूर जवळील नेवाज नदीत वाळू तस्करी करत असलेल्या वाळू माफियांना अटक करण्यासाठी पोलिस निरीक्षक रिना पाठक आपल्या पथकासह गेल्या होत्या. त्यावेळी वाळू माफियांनी पोलिसांवर लाठ्या व दगड्याने हल्ला केला. यामध्ये पोलिसांना दुखापत झाली असून, गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चार महिलांसह 21 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर वाळू चोरी होत असल्याची तक्रार आल्यानंतर पाठक कारवाईसाठी गेल्या होत्या. पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी दोन ट्रॅक्टर आणि काही जणांना ताब्यात घेतले आहे.