ट्रकचा हॉर्न कितीही जोरात वाजला तरी हरकत नाही; पण ट्रकच्या मागे “हॉर्न प्लीज‘‘ असे लिहिलेले चालणार नाही, अशा एका विचित्र आदेशाची अंमलबजावणी आर.टी.ओ. कार्यालयामार्फत सध्या सुरू झाली आहे. यापूर्वी ट्रक किंवा त्यासारखे अन्य अवजड वाहन आर.टी.ओ.त पासिंगसाठी आणताना पाठीमागे “हॉर्न प्लीज‘‘ असे पेंटरकडून रंगवून घेतल्याशिवाय पासिंग होत नव्हते. आता मात्र “हॉर्न प्लीज‘ अक्षरे पुसूनच ट्रक पासिंगसाठी आणले जात आहेत. साधारण गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
वाहनांच्या मागे “हॉर्न प्लीज‘ असे लिहिलेले असले की त्याच्या मागचा वाहनचालक हॉर्न वाजवण्यास उद्युक्त होतो. त्यातून ध्वनिप्रदूषणाचा काटा वर चढत जातो म्हणून हा आदेश परिवहन विभागाने काढला आहे. मात्र त्याच वेळी रात्रीच्या शांत वातावरणात किमान एक किलोमीटर अंतरापर्यंत आवाज जाऊन पोचेल एवढे कर्कश हॉर्न बेकायदेशीरपणे बाजारात विक्रीस आले आहेत. समोरच्या माणसाला सावध करण्यासाठी हॉर्नचा इशारा जरूर आवश्यक आहे; पण हॉर्नचा आवाज ऐकून समोरच्या माणसाचे कान फुटतील इतके कर्कश हॉर्न अनेक वाहनांना बसवले आहेत. लोक या वाहनांवरील कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. पण आर.टी.ओ. “हॉर्न प्लीज‘ असे लिहिलेल्या वाहनावर कारवाईच्या तयारीत आहे.
बहुतेक ट्रकच्या मागे हॉर्न प्लीज असे लिहलेले असते. प्रत्येक ट्रकवर असे लिहायचा नियम होता का, याची चौकशी करता हा नियम नव्हताच; पण पूर्वीपासून असे लिहिले जाते. मग एकाने लिहिले म्हणून दुसऱ्याने लिहिले अशा पद्धतीने तो अलिखित नियम तयार झाला. मात्र पुढच्या वाहनचालकाला आपण ओव्हरटेक करत आहोत किंवा मागे दुसरे वाहन आहे याचे संकेत मिळण्यासाठी हॉर्न वाजवावा म्हणून हॉर्न प्लीज, असे लिहिण्यास सुरवात झाल्याचे सांगण्यात आले.
“हॉर्न प्लीज‘ म्हणजे हॉर्न वाजण्यास प्रोत्साहन. त्यातून प्रदूषण टाळण्यासाठी आर.टी.ओ.नी कारवाईस सुरवात केली आहे. पण बाजारात फॅन्सी हॉर्न दोन-अडीच हजारांत आणि चायनीज हॉर्न सातशे- आठशे रुपयांत उघडपणे मिळतात. वास्तविक ट्रकसोबत कंपनीने बसवलेला टी हॉर्नच अधिकृत हॉर्न मानला जातो; पण काही ट्रकचालकांची मानसिकता अशी, की त्यांना हॉर्न दणकेबाजच असावा लागतो. हे हॉर्न इतके दणकेबाज आहेत, की हॉर्न ऐकून समोरचा माणूस दचकतो. रात्रीच्या वेळी झोपेतून दचकून उठतो, अनेक वेळा समोरचा वाहनचालकही कर्कश हॉर्नमुळे गोंधळून जातो.
यासंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश केसरकर म्हणाले, “”हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण होते हे खरे आहे; पण सर्व कर्कश हॉर्न बेकायदेशीरपणे उत्पादित होतात. ते उघडपणे दुकानांतून विकले जातात. जर असल्या हॉर्न उत्पादक व विक्रेत्यांवर कारवाई झाली तर हे कर्कश हॉर्न ट्रकचालक लावूच शकणार नाहीत. “हॉर्न प्लीज‘ असे पुसून ध्वनिप्रदूषण कधीच थांबणार नाही. 27 जूनला चंदीगड येथे होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत मी कर्कश हॉर्नचा मुद्दा मांडणार आहे.‘‘
ट्रकच्या हॉर्नची तीव्रता इतकी आहे, की रात्री गैबी घाटात हॉर्न वाजवला तर राधानगरीत असलेल्या ट्रकच्या मालकाला ट्रक येत असल्याचा संदेश मिळतो. काही ट्रकचालक व मालकांची मानसिकता अशी आहे, की आपल्या ट्रकचे अस्तित्व लांबूनही कळले पाहिजे. त्यातून कर्कश हॉर्नचे प्रमाण वाढले. कोल्हापुरात तर असे कर्कश व्हॉर्न विक्रीची दुकाने सलग एका रांगेत आहेत.