अवघ्या आठवडय़ापूर्वी मुंबई अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या १६ फायर इंजिनात गळकी निघाली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेल्या बुधवारी या १६ फायर इंजिनचे लोकार्पण झाले होते. या फायर इंजिनमधील पाणी गळत असल्याचे धक्कादायक माहिती देत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते आंबेरकर यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे ही बाब उघडकीस आणली. गेल्या बुधवारी लोकार्पण झालेल्या १६ फायर इंजिनमध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी प्रेशर पंप तसेच इंजिनमधील सुमारे ४५०० लिटर असलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली असल्याचे त्यांनी सांगितले. ही १६ फायर इंजिन नवीन असताना त्याला गळती कशी लागली, असा सवालही त्यांनी केला.
विशेष म्हणजे मी केवळ आरोपच करत नाही तर मेमनवाडा अग्निशमन केंद्रात चक्क फायर इंजिन चालकांनी याची तक्रार नोंदवहीत केल्याची पुष्ठीही त्यांनी दिली. या फायर इंजिनच्या बॉडीसह बांधणीसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीला गळती लागली असेल व प्रेशर पंप नसेल तर ही बाब गंभीर आहे. हा भ्रष्टाचार असून याची सखोल चौकशीच व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर हा हरकतीचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी राखून ठेवला.