शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार’ असे वचन ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दिले होते. मुंबई महापालिकेने या वचनाची पूर्तता केली असून या नाट्य संग्रहालयासाठी तब्बल १ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच संगीत रंगभूमीच्या संर्वधनासाठी मराठी रंगभूमी भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी ५ लाखांची तरतूद आहे. सुमारे ५०० कोटींच्या सुधारणांसह महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. स्थायी समितीने ५०० कोटींची सुधारणा करताना बेस्टसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. आयुक्तांनी केवळ १० कोटी रुपये देऊन बेस्टची बोळवण केली होती. मात्र शिवसेनेने ही तरतूद ९० कोटीनी वाढवून १०० कोटी केली आहे. या १०० कोटींपैकी ९० कोटी भांडवली खर्चासाठी वापरता येणार असून १० कोटी बॅटरीवर चालणार्या बसेस खरेदी करण्यासाठी देण्यात आले आहेत. या बसेसचा फोर्ट फेरीसारखा वापर करण्यात येणार असल्याचेही फणसे म्हणाले. तसेच नगरसेवकांना विकास निधी म्हणून २३२ कोटी निधी देण्यात येणार असल्याने नगरसेवकांची चांदीच होणार आहे. स्थायी समितीत गेले तीन दिवस महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलेल्या वचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासाच्या स्मृती जपण्यासाठी आणि येणार्या प्रत्येक पिढीला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ कळावा यासाठी नाट्यसंग्रहालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात नाट्यसंग्रहालय उभारण्यासाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. आणखी तरतूद… – माथाडी भवनसाठी दोन कोटी – धारावीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी पाच लाख – संयुक्त महाराष्ट्र जयंतीसाठी सहा लाख – मराठी भाषा प्रशिक्षण वर्गासाठी १० लाख – डबेवाला भवनसाठी दोन कोटी – भूमिपुत्रांना स्वयंरोजगार केंद्र उभारण्यासाठी ५० लाख – मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पीएच.डी करणार्यांसाठी एक लाख – मराठी नाट्य आणि साहित्यसंमेलनासाठी २५ लाख – भागोजी कीर स्मारकासाठी एक लाख – प्रभादेवीत आगरी भवन उभारण्यासाठी पाच लाख – आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी एक लाख – वर्सोवा येथे कोळी भवन उभारण्यासाठी पाच लाख – स्त्री आरोग्य देखभाल केंद्र उभारण्यासाठी १० लाख – क्रिकेट आणि फुटबॉल अकादमी उभारण्यासाठी पाच लाख – मराठी साहित्य भवनासाठी पाच लाख – लोककला व खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची संकल्पना यशस्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर लोकांच्या सूचना मागविण्याची संकल्पना महापालिकेसाठी फायद्याची ठरली असून नागरिकांनी केलेल्या या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार मेट्रो सिनेमाजवळील फिटज्गर्लड फाऊंटनची दुरुस्ती, महात्मा गांधी मार्गावरील प्याऊसाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच चर्चगेटजवळील पादचारी प्लाझासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाची तरतूद वाढवली, रेसकोर्ससाठी पाच कोटी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाची तरतूद वाढवण्यात आली आहे. आता ही तरतूद १ कोटी ९० लाख करण्यात आली आहे तर रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. – नाट्य संग्रहालयासाठी सुधारित विकास आराखड्यात जागा आरक्षित करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले आहे, अशी माहिती सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली. – महापालिकेने पहिल्यांदाच पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली असून त्याकरिताही एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे
महापालिका मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार
