हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनय करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आपल्या वयाच्या ९४ व्या वर्षी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. १८ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप कुमार यांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. वृद्धापकाळात दिलीप कुमार यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितल्यामुळे सोशल मिडीयावर यावरून टीका सुरू आहे.
१८ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर गिरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एस खराडे सुनावणी करणार आहेत. याबाबत मंगळवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.
‘दिलीप कुमार यांच्या प्रकृती नाजूक आहे. तरीही सुनावणी पुढे ढकलली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे, दिलीप कुमार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी तुम्ही प्रार्थना करा. मला तुमचा पाठिंबा हवा आहे,’ असे सायरा बानू यांनी टि्वटरवर पोस्ट केले आहे.
काय आहे हे प्रकरण?
डेक्कन सीमेंटस या कंपनीने दिलीप कुमार यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. दिलीप कुमार १९९८ साली कोलकात्यातील जीके एक्जिम इंडिया लिमिटेड कंपनीत संचालक होते. डेक्कन सीमेंटसने या जीके कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक फेडण्याची वेळ आली. तेव्हा दिलीप कुमार संचालक असलेल्या कंपनीने दोन चेक जारी केले पण ते बाऊंस झाले. त्यानंतर डेक्कन सीमेंटसने दिलीप कुमार यांच्याविरोधात खटला दाखल केला