शिवाजी पार्कमध्ये मुंबईतील सर्वात मोठा ध्वज उभारण्यात येणार असून त्याकरिता फ्लॅग फाऊंडेशनचे सहकार्य घेतले जाणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाजवळ किंवा मैदानाच्या मधोमध अशा दोन जागा त्याकरिता निवडण्यात आल्या असून हेरिटेज समितीच्या परवानगीनंतर शिवाजी पार्कवर हा ध्वज उभारला जाणार आहे. शिवाजी पार्कला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक शासकीय कार्यक्रम, २६ जानेवारीची परेड या मैदानावर होते. त्यामुळे इथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज असावा या हेतूने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रयत्न सुरू केले होते. फ्लॅग फाऊंडेशन या दिल्लीच्या संस्थेशी चर्चा करून काही महिन्यांपूर्वी त्यांनी महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवला होता. सध्या हा प्रस्ताव हेरिटेज समितीकडे निर्णयासाठी प्रलंबित असून समितीच्या परवानगीनंतर फ्लॅग फाऊंडेशन, महानगरपालिका आणि खासदार निधी या माध्यमातून हा ध्वज उभारण्यात येईल अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. फ्लॅग फाऊंडेशन ही दिल्लीतील संस्था असून देशभरात अनेक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून ध्वज उभारले आहेत. त्या ध्वजाची, ध्वजस्तंभाची देखभाल, काळजी संस्थेमार्फत घेतली जाते. हे ध्वज उतरवले जात नाहीत. याकामी संस्थेला अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे हीच संस्था सहकार्य करणार असल्याची माहिती शेवाळे यांनी दिली तर या राष्ट्रध्वजासाठी संस्थेने दोन जागा निश्चित केल्या आहेत. मैदानाच्या अगदी मधोमध आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाजवळ अशा दोन जागा निवडल्या आहेत. त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
शिवतीर्थावर मुंबईतील सर्वात उंच तिरंगा फडकणार!
