निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे दडपण, घडय़ाळाच्या काटय़ावर काम करणारे ४०० कर्मचारी, ५० अभियंत्यांची फौज आणि त्यांच्यावर बारीक नजर ठेवून असलेले रेल्वे आणि एमआरव्हीसीचे अधिकारी. यामुळे अवघ्या ७२ तासांत हार्बरवरील फलाट विस्तारीकरणासाठी घेतलेला हा महाब्लॉक मार्गी लागल्याचे एमआरव्हीसी तसेच रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना सोमवारी कोणताही त्रास होणार नसल्याचा दावा रेल्वेने केला.
सीएसटी येथील फलाट क्रमांक दोनचे बांधकाम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. रुळाची जागा बदलल्यानंतर ओव्हरहेड वायरची जागा बदलणे, क्रॉसओव्हर पॉइंटची देखभाल करणे, रुळाखाली खडी पसरवणे आदी कामे रविवारी सायंकाळपर्यंत सुरूहोती. ही कामे संपल्यानंतर रुळाजवळील सर्व साहित्य बाजूला घेण्यात येणार आहे.
त्यानंतर मध्यरात्री रूळ वाहतुकीसाठी योग्य आहेत की नाही याची चाचणी घेण्यात आली. हा ब्लॉक रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, सोमवारच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही. ती वाहतूक वेळेतच पूर्ण होईल, असा विश्वास मध्य रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
हार्बरवर गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री १.३३ वाजल्यापासून हे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी फलाट क्रमांक २ वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दरम्यान, विस्तारीत फलाटांचे काम येत्या ३५ दिवसांच्या काळात पूर्ण होणार असून त्यानंतर टप्प्याटप्याने हार्बरच्या ताफ्यात १२ डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत.