इटालियन विचारवंत उंबर्टो इको यांचे निधन

द नेम ऑफ द रोज या १९८० मधील कादंबरीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले प्रख्यात इटालियन लेखक आणि विचारवंत उंबर्टो इको यांचे शुक्रवारी रात्री कर्करोगाने मिलान शहरातील घरी निधन झाले. ८४ वर्षाचे आयुष्य लाभलेले उंबर्टो इको इटालियन संस्कृतीचे तज्ज्ञ म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनानंतर जगभरातून साहित्यिक विश्वातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असलेले इको सांकेतिकतेच्या शास्त्रातील तज्ज्ञ मानले जात. संस्कृतीचा अर्थ तिच्या संकेतांनी-शब्द, धार्मिक चिन्हे, मूर्ती, बॅनर्स, कपडे आणि अगदी व्यंगचित्रांद्वारे लावण्याच त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या विषयावर तब्बल २० नॉन फिक्शन प्रकारातील पुस्तके त्यांनी लिहीली. युरोपातील सर्वात जुन्या बोलोग्ना विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले.

एकीकडे अध्यापक आणि संशोधक तर दुसरीकडे कादंबरीकार अशा दोन्ही जगांत सारख्याच कौशल्याने त्यांनी कर्तृत्त्व गाजवले. त्यांच्या सात कादंब-यांत द नेम ऑफ द रोज ही कादंबरी कमालीची गाजली आणि बेस्ट सेलरही ठरली. १९८० मध्ये मूळ युरोपात प्रसिद्ध झालेल्या कांदबरीच्या १ कोटी प्रती छापाव्या लागल्या. मात्र त्यांच्या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये बनलेल्या चित्रपटाला शॉन कॉनरीची भूमिका असूनही तितकासा प्रतिसाद लाभला नाही.

या कादंबरीचे कथानक १४ व्या शतकातील इटालियन मठावर आधारित असून तेथे त्यात अ‍ॅरिस्टॉटलच्या हरवलेल्या निबंधावरून संन्याशांची सहकारी संन्यासी हत्या करत असत. या कादंबरीत इको यांनी ख्रिश्चन तत्त्वज्ञानाची चर्चा केली असली तरीही त्याला स्वरूप रहस्यमय कादंबरीचे दिले असल्याने वाचक गुंगून जातात. साहित्यिक दृष्टय़ा इको याच कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय जगात प्रसिद्ध होते. त्यानंतर इको यानी सात कादंब-या लिहील्या आणि त्यात फॉकल्ट्स पेंडुलम हिचाही समावेश होता.

अखेरची कादंबरी न्युमेरो झिरो ही कादंबरी गेल्या वर्षी प्रकाशित झाली. इको यांच्या कादंब-या लाखोनी खपल्या असल्या तरीही सामान्यजनांत त्या समजण्यास अवघड मानल्या जात होत्या. खुद्द इको यांचे म्हणणे वाचक सोप्या आणि सरधोपट लिखाणाने कंटाळले आहेत, असे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *