जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याचा जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग करून या प्रकरण योग्य रीतीने हाताळण्याचे आदेश दिले. या याचिकेची सुनावणी घेण्यास नकार देताना, थेट हस्तक्षेप केल्यास धोकादायक पायंडा पडेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्या. चेलामेश्वर आणि न्या. ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. ‘थेट हस्तक्षेप केल्यास चुकीचा संदेश दिला जाईल. प्रत्येक संवेदनशील प्रकरणाची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय हे एकमेव न्यायालय योग्य आहे, अशी समजूत होणे धोकादायक आहे. तसेच, अशाप्रकारचे हे एकमेव प्रकरण नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणावरून तापलेले वातावरण आणि कन्हैया कुमारला मारहाण झाल्याची घटना लक्षात घेता, त्याच्या आणि त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिस घेत असल्याची कबुली न्यायालयाने सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांच्याकडून घेतली. तसेच, सुनावणी वेळी या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना न्यायालयात प्राधान्याने प्रवेश द्यावा, असेही खंडपीठाने आदेश दिले आहेत. याचिकेत सुधारणा करून ती दिल्ली उच्च न्यायालयात मांडण्याची परवानगी या खंडपीठाने कन्हैया कुमारच्या वकिलांना दिली आहे.
कन्हैया कुमारच्या जिवाला धोका असल्याने आणि प्रकरण संवेदनशील झाल्यानेच थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्याच्या वकिलांनी मांडलेले म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले. सत्र न्यायालयात उद्भवलेल्या प्रसंगाची नोंद घेतली आहे, तसेच त्यामुळे उच्च न्यायालयाला डावलून थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याने चुकीचा पायंडा पडेल, असे खंडपीठाने सांगितले. कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपानंतर १२ फेब्रुवारीला अटक झाली आहे. ‘जेएनयू’च्या परिसरात झालेल्या वादग्रस्त कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर कन्हैया कुमारने जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचे वकील सुशिल बजाज आणि वृंदा ग्रोव्हर यांना पोलिस संरक्षणात न्यायालयात आणण्यात आले. सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. कन्हैय्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
दिवसभरात
अफजल गुरूची छायाचित्रे घेऊन श्रीनगरमध्ये निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविले, पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष
मोर्चामध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकल्याचा दावा
कन्हैया कुमारच्या सुटकेची मागणी करत विविध ठिकाणी मोर्चे
कन्हैयावरील आरोप रद्द करण्याची डाव्या पक्षांची मागणी, अन्यथा २३ फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा
शरण येण्याचे उमर खालिदला त्याच्या वडिलांचे आवाहन
जेएनयू विद्यार्थी संघटनेविरोधात भाजपचा मुंबईत मोर्चा
‘जेएनयू’मधील कार्यक्रम खोटे कारण सांगून आयोजित केला होता, असा येथील प्राध्यापकाचा दावा.
दिल्लीमध्ये वकीलांचा मोर्चा
हैदराबाद आणि जयपूरमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये मारामारी
