मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक काही घटकांचे प्रमाण नियमापेक्षा अधिक आढळल्याने हलकल्लोळ निर्माण झाला असतानाच आज राजधानी दिल्लीमध्येही मॅगीवर पंधरा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सर्व दुकानांमधून मॅगीची पाकिटे परत घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांनंतर मॅगीच्या नव्या स्टॉकची तपासणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले आहे. अनेक राज्यांनी मॅगीचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत.
उत्तर प्रदेशसह काही ठिकाणी मॅगीमध्ये मोनोसोडिअम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक आढळल्याने ते शरीराला अपायकारक असल्याच्या कारणावरून त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर दिल्लीमध्येही तपासणीचे आदेश दिले होते. या चाचणीमध्ये मॅगीमध्ये अपायकारक घटक आढळल्याने पंधरा दिवसांसाठी मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मॅगीची उत्पादक कंपनी असलेल्या नेस्ले इंडिया या कंपनीने मात्र आपल्याला उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा अपवाद वगळता कोणत्याही राज्याकडून अथवा केंद्र सरकारकडून मॅगीची पाकिटे बाजारातून काढून घेण्याबाबत आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रयोगशाळेतही चाचणी घेऊन मॅगी खाण्यास योग्य असल्याचे दिसून आल्याचा दावा नेस्लेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तरीही, अनेक मॉलचालकांनी मॅगीची पाकिटे दुकानातून काढून टाकल्याचे निदर्शनास येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, शरीरात शिसाचे प्रमाण अधिक झाल्यास त्याचा मूत्रपिंड, हाडे आणि मज्जासंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो. लहान मुलांवर त्याला लवकर परिणाम होतो. एमएसजीचा वापर चवीसाठी अन्नामध्ये केला जातो. मात्र त्याचाही अतिरिक्त आणि बराच काळ वापर केल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, देशभर मॅगीबाबत निर्माण वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले आणि अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची आज भेट घेतली. जैन यांच्या सूचनेनुसार या दोघांनी आपापल्या बाजू त्यांच्यासमोर मांडल्या.
बिग बाजारमधूनही मॅगी हद्दपार
मॅगीमधील शिशाचे प्रमाण अधिक असल्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या विकासावर होत असल्याने याची गंभीर दखल फ्युचर समूहानेदेखील घेतली आहे. फ्युचर समूहाच्या बिग बाजार, ईझी डे व निलगिरी या रिटेल साखळी दालनांतून मॅगीची विक्री थांबविण्यात आली आहे.
याचा मोठा फटका नेस्ले कंपनीला बसणार आहे. ग्राहकांच्या भावना ओळखून व ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे फ्युचर समूहाने एका निवेदनात म्हटले आहे. मॅगीतील घटकांबाबत संबंधित प्रशासकीय व नियामक यंत्रणांकडून क्लिन चिट मिळेपर्यंत मॅगीची विक्री फ्युचर समूहातील दालनांतून बंद राहणार आहे. आर्मी कॅन्टिनमधूनही मॅगीची विक्री थांबविण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने दिले आहे. याशिवाय देशातील तब्बल १० राज्यांनी दुकानांतून मॅगी विकण्याला मनाई केली आहे.
‘मॅगी’ वादासंदर्भात अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ‘मॅगी’ची जाहिरात करणे थांबवले आहे. या प्रकरणात नोटीस मिळाल्यास तपासात पूर्ण सहकार्य करू.
– अमिताभ बच्चन, चित्रपट अभिनेते
बारा वर्षांपूर्वी मॅगीची जाहिरात केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयीचे वृत्त वाचले. बारा वर्षांपूर्वी? हे कसं घडू शकते?
– प्रीती झिंटा, चित्रपट अभिनेत्री
मोनोसोडिअम ग्लुटामेटचे अतिसेवन लहान मुले आणि वयस्कर नागरिकांना त्रासदायक आहे. घाम येणे, हाता-पायांत विचित्र भावना, नॉशिया, डोकेदुखी, मळमळणे, भूक कमी होणे यांसारखे साइड इफेक्ट जाणवतात. मुळात मोनोसोडिअम ग्लुटामेट टेस्ट मेकर, प्रिझर्व्हेटिव्ह आहे. सर्वांत घातक म्हणजे त्यामुळे मुलांमध्ये स्थूलपणा वाढीस लागतो, त्याबरोबर अस्थमाचे एक कारण होऊ शकतो.
– डॉ. सुनील गोडबोले, बालरोगतज्ज्ञ, पुणे