सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाला तिसऱ्या तिमाहीत तब्बल 3,342.04 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेला इतर बॅंकांच्या तुलनेत बुडीत कर्जामुळे सर्वाधिक तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत बॅंकेला 333.98 कोटी रुपये नफा झाला होता. बॅंकेच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. बॅंकेचे एकूण उत्पन्न 11,808.34 कोटी रुपयांवरून 11,726.95 कोटी रुपयांवर पोचले आहे.
बडोदा बॅंकेतील बुडीत कर्जांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बॅंकेतील एकूण (ग्रॉस) बुडीत कर्जाचे प्रमाण 9.68 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 3.85 टक्के होते. एकूण बुडीत कर्जांची रक्कम 15,452 कोटी रुपयांवरून 38,934 कोटी रुपयांवर पोचली आहे. तसेच निव्वळ (नेट) बुडीत कर्जाचे प्रमाण वार्षिक आधारावर 2.11 टक्क्यांवरून 5.67 टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे त्यावरील उपाययोजनांसाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात बॅंकेने बुडीत कर्जांसाठी 6,164.55 कोटी रुपयांचा आकस्मिक खर्च केला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 1,262.25 कोटी रुपये होते.