मध्य रेल्वेवरील भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेने एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त प्रवाशांनी सँडहर्स्ट रोड येथे रेल रोको आंदोलन केले.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गौरव व्होरा हा मुलगा शाळेतून परतत होता. त्यावेळी भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या मुलाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संतापलेल्या स्थानिकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती.
रेल्वे ब्रिज नसल्यामुळे येथे रहाणा-या स्थानिक नागरीकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. येथील स्थानिक नागरीक अनेक वर्षांपासून रेल्वे ब्रिजची मागणी करत आहेत.
यापूर्वीही रेल्वेब्रिज नसल्याने रुळ ओलांडताना अनेक बळी गेले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात ही दुर्घटना घडल्याने प्रवाशी व स्थानिक नागरिक संतप्त झाले. येथील जुना पुल काढण्यापुर्वी नवीन पुल बांधण्याची गरज होती, असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान संतप्त आंदोलकांना रूळावरून हटवण्यात आले असून या संदर्भात बुधवारी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिका-यांची बैठक होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिका-यांनी दिली.