कांद्याची किंमती दिवसेंदिवस घसरत असून शेतक-यांना तो आता रडवायला लागला आहे. घाऊक बाजारात कांद्याची किंमत किलोला ७ रुपये झाली आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये कांद्याची किंमत किलोला ४१.३० रुपये होती. त्यानंतर पुरवठा वाढल्याने ती सातत्याने घसरत गेली. नाशिकच्या नॅशनल हॉर्टिकल्चर अॅँड रिसर्च फाऊंडेशनने सांगितले की, सध्या घाऊक बाजारात कांद्याची किंमत कमीत कमी ४ रुपये तर जास्तीत जास्त १० रुपये आहे.
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश ही राज्य सर्वाधिक कांदा पिकवणारी आहेत. या राज्यातून बाजारात पुरवठा वाढल्याने कांद्याच्या किंमतीत घसरण झाली. येत्या काही दिवसांत या दरात आणखी एक ते दोन रुपयांची घसरण अपेक्षित आहे.
२०१४-१५ या वर्षात कांद्याचे पीक कमी झाले. त्यामुळे कांद्याच्या किंमत देशभरात प्रचंड प्रमाणात वाढल्या. सरकारने या किंमती कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात कांदा आयात करण्याची उपाययोजनाही हाती घेण्यात आली.