मुंबईत गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या चड्डी बनियान टोळीतील चारजणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सोमवारी पहाटेच्या वेळेस बोरिवली येथे दरोड्याच्या प्रयत्नात असतांना या चारजणांना अटक करण्यात आले. तर तीनजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
बोरिवलीतील शिंपोली भागात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चड्डी बनियान टोळीच्या दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी दरोडा घातला. त्यानंतर त्यांना मारहाण केली. ते दोघे यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शेजारील रहिवाशांना याची चाहूल लागली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक सुरु झाली.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यातच चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तीन जणांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. त्या तिघांना अटक करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरु आहे.
परिसरात पहाटे गोळीबाराचा आवाज ऐकल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून या चड्डी बनियान टोळीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती. चड्डी-बनियान घालून चेह-यावर मास्क लावून ही टोळी दरोडे घालत होती.
दरोडा घालतांना काहींची हत्या तर अनेकांना हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अखेर पोलिसांना सोमवारी पहाटे यांच्यापैकी चार जणांना पकडण्यात यश आले आहे.