परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यभर हेल्मेट सक्ती केली असताना त्यांच्या या निर्णयाला भाजपाच्या पुणेकर मंत्रीमहोदयांनी तीव्र विरोध केल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीत नवा कलगीतुरा सुरू झाला आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्याकडूनच एखाद्या निर्णयाला कडाडून विरोध होण्याचा हा दुर्दैवी प्रसंग फडणवीस सरकारच्या राज्यात वारंवार अनुभवण्याची वेळ येत आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे या भाजपातील मंत्र्यांनी विरोध केला आहे.
हेल्मेट न वापरल्याने दुचाकी अपघातात मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत मागे बसणा-यांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मंत्रिमंडळातील रावते यांचे सहकारी मंत्री गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. बापट यांच्या समर्थकांनी पुण्यात रावते यांच्या निर्णयाची प्रेतयात्राच काढली. तर जागोजागी भाजपा कार्यकर्त्यांनी दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवून फडणवीस सरकारची कोंडी केली. यावर हेल्मेटसक्ती केवळ पुण्यात नसून संपूर्ण राज्यात आहे, अशी सारवासारव रावते यांनी केली आहे.
मात्र पालकमंत्री या नात्याने कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी माझ्याशी चर्चा केली नाही, असे सांगत गिरीश बापट यांनी आपला या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे सांगितले. त्यावर परिवहन खात्याच्या निर्णयावर कारवाईची जबाबदारी गृहखात्याची असल्याचे सांगत रावते यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.