कारस्थानी पाकिस्तानची हेडलीकडून पोलखोल

कारस्थानी पाकिस्तानची हेडलीकडून पोलखोल

संपूर्ण जगाला हादरवणा-या मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याची सोमवारी मुंबईत विशेष न्यायालयासमोर साक्ष होणार असतानाच, त्याने या हल्ल्यामागील पाकिस्तानी कट-कारस्थानांची तपशीलवार माहिती उघड केली आहे. या भयंकर दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची स्पष्ट कबुली हेडलीने राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या चौकशीत दिली आहे. पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, हफीज सईद यांची नावेही त्याने सांगितली असून, ‘सीएनएन्म-आयबीएन’ने हेडलीचा हा जबाब उघड केला आहे. मुंबईवरील या भीषण दहशतवादी हल्ल्यात १६६ निरपराध नागरिकांचा आणि जाँबाज पोलीस अधिका-यांचा बळी गेला होता.

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद याची मंजुरी घेऊन आणि आयएसआय तसेच पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने हल्ल्याचा कट राबवण्यात आला, असे हेडलीने म्हटले आहे. भारतात आपण केलेल्या पाहणीसाठी आयएसआयनेच पैसे पुरवले होते. मुंबईतील अनेक ठिकाणांची आपण पाहणी केली, त्याचप्रमाणे दिल्लीतील उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, इंडिया गेट व सीबीआय कार्यालयाची टेहळणी आपण केली होती, असेही हेडलीने उघड केले आहे. त्याची सोमवारी मुंबई येथील न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यात अनेक खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या चौकशीत, हेडलीने आपले नियंत्रक आयएसआयचे मेजर इक्बाल व समीर अली हे होते तर तोयबाच्या जकीउर रेहमान लखवीशी आयएसआयचा ब्रिगेडियर रिवाज हा अधिकारी संपर्क ठेवून होता, असेही सांगितले आहे. आयएसआयच्या मदतीनेच मुंबई हल्ला घडवण्यात आला. लखवीला मुंबई हल्ल्यानंतर अटक केल्यावरही आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांनी त्याची तुरुंगात भेट घेतली होती, असाही हेडलीने कबुलीजबाब दिला आहे.

१० डिसेंबरला न्यायालयाने हेडलीची शिक्षा माफ केली असून त्याला मुंबई हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षीदार केले आहे. मुंबई हल्ल्यांच्या आधी ठिकाणांची पाहणी केल्याचा आरोप असलेल्या हेडलीला अमेरिकन न्यायालयाने ३५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

 हेडलीची आजमुंबईत साक्ष

मुंबई – मुंबईवरील भीषण अशा २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीची सोमवारी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर साक्ष होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत व्हीडिओ लिंकद्वारे ही साक्ष नोंदवण्यात येणार असल्याची माहिती या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. मुंबई दहशतवादी हल्ल्याआधीचा घटनाक्रम त्यात हेडली उलगडणार असल्याचे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

भारताच्या कायद्याच्या इतिहासात प्रथमच एक परदेशी अतिरेकी व्हीडिओ लिंकद्वारे पुरावा सादर करणार असून त्याचा पुरावा नोंदवला जाईल. मुंबईवरील हल्ल्याबाबत अनेक गोपनीय गोष्टी त्यात उघड होणार असल्याने त्याची साक्ष महत्त्वाची आहे, असे निकम म्हणाले. हल्ल्याचा कट का रचला, त्यामागे कोण लोक होते आणि १६६ लोकांचा बळी घेईपर्यंत तो पुढे कसा सरकला, याची माहिती हेडली देणार असल्याने हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील एक दहशतवादी अबू जिंदाल पाकिस्तानात असून त्याच्याविरोधातही हेडलीची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. हेडलीच्या साक्षीमुळे या खटल्याच्या सुनावणीवर व्यापक परिणाम होणार आहे. मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून डेव्हिड हेडलीवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी विविध ठिकाणांची रेकी करून ती दहशतवाद्यांना पुरवण्याची जबाबदारी डेव्हिड हेडलीने स्वीकारली होती. हेडली हा लष्कर-ए-तोयबा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबई हल्ल्यातील आरोपी अबू जिंदाल यांच्यासोबत सहभागी झाला होता. मुंबई हल्ल्यातील गुन्हांची कबुली हेडलीने दिली. त्यामुळे त्याला १० डिसेंबर, २०१५ रोजी माफीचा साक्षीदार बनविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *