पुण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते हेल्मेटसक्तीला विरोध करत असताना भरधाव कारच्या धडकेने हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात हा अपघात शनिवारी उशिरा रात्री झाला.
सुनील कुमार तिवारी (४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुनील हे त्यांच्या दुचाकीवरून धानोरी रस्त्याने भैरवनगरकडून गोकुळनगरकडे जात होते. त्यावेळी लोहगावकडून येणा-या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात सुनील गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुनील अपघातानंतर रस्त्यावर कोसळले. त्यांना इतर कोठेही इजा झाली नव्हती. पण डोक्याला जबर मार लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
राज्यात हेल्मेटसक्तीच्या विरोधात राजकीय नेते आंदोलन करत असताना दुसरीकडे हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
दुचाकी चालवणारा चालक आणि मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितले.