मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं फास्टफूड मानला जाणारा वडापाव आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील गोडाधोडाच्या पदार्थांची राणी म्हणावी अशी पुरणपोळी आता जगभरात ओळख मिळवणार आहे. लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांशी हातमिळवणी करुन पुरणपोळी आणि वडापावला आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
महाराष्ट्रातल्या लहानमोठे व्यावसायिक आणि केटरर्ससोबत टाय-अप करुन पुरणपोळी आणि वडापावला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग सचिव वल्सा नायर सिंग यांनी दिली.
वडापाव कसा खाद्यप्रेमींचा लाडका झाला?
दिवसभर घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरांना वडापावच्या रुपाने गेल्या काही वर्षांत एक नवा पर्याय उपलब्ध झाला. राज्यात प्रसिद्ध असलेले बटाटेवडे पावात जाऊन बसले आणि त्यांच्या एकत्रित चवीची चटक अनेकांना लागली. एका हातात धरुन खाता येणाऱ्या फ्रँकी, सँडविच सारख्या विदेशी पदार्थांच्या तुलनेत वडापाव या महाराष्ट्रीय पदार्थांने बाजी मारली. फक्त मुंबईकरच नव्हे तर दिल्लीसारख्या अनेक मेट्रोसिटीजमध्ये हा पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे.