प्रियांका चोप्रा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणार

प्रियांका चोप्रा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणार

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास असणार आहे. कारण बॉलिवू़डची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात पुरस्कार प्रदान करताना दिसणार आहे. अॅकडमीने यंदाच्या ऑस्कर सोहळयात पुरस्कार प्रदान करणा-यांची नावे टि्वटरवरुन जाहीर केली असून त्यात प्रियांका चोप्राचेही नाव आहे. २९ फेब्रुवारीला सोमवारी सकाळी डॉल्बी थिएटरमध्ये ८८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
ऑस्कर हा हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा आहे. जगभरातील चित्रपट रसिक, समीक्षकांचे ऑस्कर पुरस्कार सोहळयाकडे लक्ष असते अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेमधून प्रियांकाने आधीच आपली छाप उमटवली आहे. या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला आहे. सध्या ती क्वान्टिकोच्या दुस-या सीझनसाठी शूट करत आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे हे नवीन वर्षही प्रियांकासाठी खूप खास आहे. गेल्या वर्षी आलेला सुपरडुपर हिट ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील तिच्या काशीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झाले.
तर या वर्षी गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या एसएजीए पुरस्कार सोहळयातही प्रियांकाने पुरस्कार प्रदान केले होते. प्रकाश झा यांच्या महत्वाकांक्षी ‘गंगाजल’ या आगामी चित्रपटात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *