देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग अद्याप धुमसत असताना या आगीत तेल ओतून शिवसेना-भाजपात राजकारणाचा भडका उडाला आहे. डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीला महापालिकेतील ‘कचरा घोटाळा’ जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्याने मित्रपक्षांत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या आगीच्या धुरामुळे घुसमट होत असलेल्या गोवंडी, देवनार भागीतील नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने संधी मिळताच भाजपा- शिवसेना एकमेकांवर निशाणा साधण्याची जराही संधी सोडताना दिसत नाहीत. देवनावर डम्पिंग ग्राऊंडवरील कच-याला लागलेल्या आग प्रकरणावरून पुन्हा भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
कचरा वाहतुकीच्या कंत्राटात मोठा घोटाळा होत असल्यानेच वारंवार अशा घटना घडत असल्याचे सांगत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी शनिवारीच मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
मुंबईतील कोणत्याही प्रश्नावर आशिष शेलार यांनी मागणी करायची व मुख्यमंत्र्यांनी लगेच कारवाई करायची, असे सूत्र ठरून गेले आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान रविवारी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आगीच्या ठिकाणाला भेट दिली व यात कचरा वाहतुकीच्या कंत्राटात कोटय़वधीचा घोटाळा झाला आहे. त्यात अनेक अधिका-यांचे हात गुंतले आहेत. या अधिका-यांना कोण पाठीशी घालत आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, स्थानिक नगरसेवक शेख मोहम्मद सिराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवाजीनगर सिग्नल, मानखुर्द लिंक रोडपासून ते थेट देवनार डम्पिंग ग्राऊंडपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चेक-यांनी मानखुर्द लिंकरोड येथे रास्ता रोको केला. देवनार येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करा. नाहीतर आम्हाला येथून हटवा! अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या डम्पिंग ग्राऊंड परिसरात भंगार माफियांचे राज्य सुरू असून त्यांच्याकडूनच अशा आगी लावण्यात येतात.
गेल्या ४० वर्षापासून अशा आगी लावण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत याबाबत अनेकदा आवाज उठवूनही त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप सिराज शेख यांनी केला आहे