तिरंगा फडकाविणाऱ्या पाक नागरिकास अटक

तिरंगा फडकाविणाऱ्या पाक नागरिकास अटक

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या समर्थकाने भारताच्या विजयानंतर घरावर तिरंगा फडकाविल्याने त्याला अटक करण्यात आली.
 
पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी ट्वेंटी-20 सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने 90 धावांची खेळी केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. अखेर या सामन्यात भारताने 37 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर उमर दराझ या कोहलीच्या समर्थकाने आपल्या घराच्या छतावर जाऊन भारताचा झेंडा फडकावत आनंद साजरा केला. याबाबतची तक्रार देण्यात आल्यानंतर उमरला अटक करण्यात आली. उमर हा कोहलीचा चाहता आहे. 
 
पोलिस अधिकारी मोहम्मद जमीन यांनी सांगितले, की आम्ही उमरच्या घरावर छापा टाकला असून, भारताचा झेंडा जप्त केला आहे. त्याच्यावर कायदा सुव्यवस्था बिघडविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्या घरात कोहलीची अनेक छायाचित्रे सापडली आहेत.
 
या कारवाईनंतर उमर म्हणाला की, मी कोहलीचा मोठा चाहता आहे. मी फक्त कोहलीसाठी भारतीय संघाला पाठिंबा दिला आणि घरावर तिरंगा फडकाविला. भारतीय क्रिकेटपटूबद्दल मला खूप प्रेम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *