दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थकित वेतन मिळावे यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.
आजपासून पुढे तीन दिवस दिल्लीतील तीन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात महानगरपालिकेतील स्वच्छता कामगार, डॉक्टर्स, शिक्षक, अभियंते आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांना जबाबदार ठेवत आज (बुधवार) साधारण 500 कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करत आहेत. पोलिसांनी निदर्शकांना रोखले असून आता हे कर्मचारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार आहेत. मागील तीन महिन्यांपासून दिल्ली महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून महानगरपालिका आणि दिल्ली सरकार यामध्ये यापूर्वीच मतभेद आहेत. दरम्यान या बाबतचे कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन हे सर्वांत मोठे समजण्यात येत असून त्याचा शहरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.