देवरूख येथील दुकानाशेजारी लावलेल्या दुचाकीच्या सीटखालून अचानक नागोबाने दर्शन दिल्याने दुचाकीस्वाराची पाचावर धारण बसली. याची माहिती मिळताच शहरातील राजू काकडे हेल्प ऍकॅडमीने त्या नागोबाची सुखरूप सुटका करून त्याला जंगलात सोडले. ही घटना साडवली-सह्याद्रीनगर येथे घडली. पकडलेला तीन फुटांचा हा नाग हा इंडियन कोब्रा जातीचा होता.
साडवली-सह्याद्रीनगर येथील व्यावसायिक संजय लाड यांची दुचाकी त्यांच्याच दुकानाशेजारी लावली होती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ते दुचाकी काढण्यासाठी गेले असता सीटखालून नागाने तोंड वर काढत फुत्कार सोडण्यास सुरवात केली. हे पाहताच ते घाबरले. त्यांनी तत्काळ राजू काकडे हेल्प ऍकॅडमीच्या बंधू बेर्डे यांना माहिती दिली. त्यानंतर पुन्हा हा नाग सीटखाली लपला. थोड्या वेळाने ऍकॅडमीचे बंधू बेर्डे, विनायक लिंबूकर, भाया खामकर, राजू शिर्के, निरंजन बेर्डे, आर्य बेर्डे, दुर्वांकुर बेर्डे घटनास्थळी पोचले. तासाभराच्या प्रयत्नानंतर दुचाकीच्या सीट खालून या नागाला बाहेर काढले.