१६० किलोमीटर वेगाने धावणा-या ‘गतिमान’ एक्स्प्रेसला हिरवा कंदील

शताब्दी, दुरंतो या भारतातील वेगवान गाडय़ांपेक्षाही अतिजलद ‘गतिमान’ एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. १६० किलोमीटर वेगाने धावणारी ही एक्स्प्रेस दिल्ली ते आग्रा हे १०५ किलोमीटरचे अंतर अवघ्या १०५ मिनिटांत पार करेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील नऊ मार्गावर ही एक्स्प्रेस चालवण्याची रेल्वेची योजना आहे.

या गतीमान एक्स्प्रेसला एक वर्षासाठी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली आहे. वर्षभरात विविध चाचण्या केल्यानंतर तिला पुढे चालवण्याचा निर्णय घेण्यात येईल, रेल्वे बोर्डाने उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कळवले आहे.

ही रेल्वे सुरू करण्याची अंतिम तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. या गाडीचे इंजिन ५४०० अश्वशक्तीचे असून त्याला खास १२ अत्याधुनिक डबे असतील. ही गाडी जास्तीत जास्त १६० किलोमीटर वेगाने चालवण्यात येईल.

सध्या दिल्ली-आग्रा शताब्दी एक्स्प्रेसला १२० मिनिटे लागतात. गतीमान एक्स्प्रेस हेच अंतर अवघ्या १०५ मिनिटांत कापेल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही गाडी चालवण्यात येणार आहे. या गाडीचे तिकीट शताब्दीपेक्षाही २५ टक्के अधिक असेल.

रेल्वेच्या जुन्याच मार्गावर ही वेगवान गाडी चालवण्याबाबत केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आक्षेप घेतले होते. रेल्वे मार्गावरील क्रॉसिंग, काही ठिकाणी कुंपण घालणे आदी उपाययोजना रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुचवल्या होत्या. यापूर्वी या मार्गावर दोन वेळा या एक्स्प्रेसची चाचणी झाली होती. या मार्गावरील सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक केली असून अनेक ठिकाणी कुंपणे घातली आहेत. या रेल्वेला आपात्कालीन ब्रेकिंग सिस्टीम, स्वयंचलित अग्निशमन अलार्म, प्रवासी माहिती यंत्रणा, सरकते दरवाजे आहेत.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास रेल्वे कानपूर-दिल्ली, चंदीगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई व नागपूर-सिकंदराबाद मार्गावर ही एक्स्प्रेस चालवण्याचे रेल्वेने ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *