मायनिंग वाहतूक करणाऱ्या डम्परचालकांच्या दादागिरीविरोधात आडाळी व मोरगाव येथील त्रस्त ग्रामस्थांनी डम्पर रोखले. पण वाहतूक जलदगतीने करून एक ट्रिप जादा मिळेल म्हणून डम्पर जलदगतीने हाकले जात आहेत. त्यामुळे अन्य वाहनधारकांना साइडदेखील मिळत नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या आरटीओ विभागाने मायनिंग वाहतूक करणाऱ्या डम्पर्सकडे दुर्लक्ष केलेले आहे. आरटीओच्या पथकाने या डम्परवर कधी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. मात्र वाहतूक पोलिसांची झुंड या वाहतुकीला पाठिंबा देत आहे.
काही खाकी वर्दीवाल्यांचे डम्पर्स या ठिकाणी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे डम्पर्स या मायनिंग वाहतुकीत आहेत. त्यात खाकी वर्दी व वाहतूक पोलिसांच्या काहीनी सेटिंग लावल्याने आरटीओ व पोलीस विभाग या डम्पर वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त जनता अधुनमधून वाहतूक रोखत आहे. कळणे-बांदा-रेडी या मार्गावर वाहतूक करताना शेकडो डम्परमध्ये स्पर्धा लागते. त्यांच्यात एखादी जादा ट्रिप मारण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे बांदा ते कळणे आणि मळगांव ते रेडी या मार्गावर डम्पर्सचालकांची दादागिरी चालते. त्या दादागिरीला काबूत आणण्यासाठी जनताच रस्त्यावर उतरण्याचे प्रसंग घडले आहेत.
या दोन डम्पर्समधील अंतर आणि रात्रीच्या वेळी डम्पर वाहतुकीबाबत र्निबध घालण्यात आले असतानादेखील त्याचे पालन होत नाही, तसेच डम्पर्सची वाहतूकही ओव्हरलोड असते असे बोलले जाते. याकडे आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.