पत्नीच्या खुनाबद्दल भारतीयाला दुबईत मृत्युदंड

पत्नीच्या खुनाबद्दल भारतीयाला दुबईत मृत्युदंड

पत्नीचा खून केल्याप्रकरणी आतिफ पोपरे नावाच्या भारतीय व्यक्तीला दुबईमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मूळ रायगडच्या आतिफचे माटुंग्यामधील तरुणी मिनी धनंजयनशी प्रेमप्रकरण होते. 2008 मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर मिनीचे नाव बदलून बुशरा असे झाले. 2009 मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर आतिफ नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेला. दोन वर्षांनी बुशराही दुबईला गेली. दरम्यान तिचा कुटुंबियांशी संपर्क तुटला. त्यानंतर दुबईजवळ असलेल्या बुशराचा भाऊ निगीलने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध न लागल्याने अखेर त्याने दुबईत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर 2013 मध्ये पोलिसांना तिचा मृतदेह सापडला.

शवविच्छेदनानंतर तिचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर बुशराचा पती आतिफनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. दुबईतील कनिष्ठ न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली. दुबईतील कायद्याप्रमाणे मृत बुशराच्या कुटुंबियांनी आतिफवर दया दाखवून माफी दिली तरच त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलू शकते. मात्र कुटुंबियांनी त्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान माफी द्यावी यासाठी आरोपीचे कुटुंबिय आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार बुशराच्या आईने केली आहे.

‘त्यांचे दोघांचे काही वाद होते याबद्दल बुशराने मला कधीच काही सांगितले नाही. मात्र तिचे सासरकडील लोक तिला त्रास देत असल्याचे मला माहित होते‘, अशी माहिती बुशराच्या आईने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *