जुहू येथील हवाईतळावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या हवाईतळावर केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली. जुहू येथील हवाईतळावरील अपुरी सुरक्षा आणि रेसकोर्सवरील प्रस्तावित मुंबई गार्डन या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जुहू हवाईतळावरील सुरक्षा अपुरी असल्याबद्दल मी २०१४ सालीच केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. अपुऱ्या सुरक्षेमुळे या हवाईतळावर दहशतवादी कारवाया होऊ शकतात, असे त्यावेळी मी पत्रामध्ये लिहिले होते, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. या मुद्द्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.