मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या बराकीच्या समोर तीन फुटाचा विषारी नाग नुकताच आढळून आला होता. त्यामुळे जेलमध्ये खळबळ उडाली होती. जेल प्रशासनाने तातडीने नजीक राहणाऱ्या सर्पमित्राला पाचारण केले. त्यांनी भिंतीच्या फटीत लपलेल्या नागाला पकडल्यानंतर संजय दत्तसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
नागाला पकडल्यानंतर काही वेळातच त्याने गिळलेल्या दोन बेडकांची उलटी केली, अशी माहिती सर्पमित्र रवी लोहिरे याने दिली. नागाला पकडत असताना लोहिरे यांनी काही वेळ संजय दत्तशी चर्चा देखील केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात जेल अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ जेलमध्ये साप, नाग दिसत असल्याने आम्ही सर्पमित्राला बोलावितो. पण, संजय दत्तच्या बाराकीसमोर विषारी नाग आढळून आला, यामध्ये तथ्य नाही. आम्ही सर्व बराकींची सुरक्षा घेत आहोत. ‘