ठाण्यातील चार तरुणांनी दस-याच्या मिरवणुकीत तरुणीचा विनयभंग करून एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्यांबाबत त्यांना वर्षानुवर्षे खडी फोडावी लागली असती. पण, तक्रारदार मुलीशी आम्ही तडजोड केली असून हा खटला रद्द करावा, अशी विनंती या चार आरोपींनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली तरी या गुन्ह्याबाबत कडक भूमिका घेत चार आरोपींना सहा महिन्यांची सार्वजनिक रस्ता झाडण्याची कम्युनिटी सव्र्हिसेसची आगळीवेगळी शिक्षा ठोठावली आहे.
गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी ठाण्यात दस-याची मिरवणूक काढली होती. यात दारू प्यायलेल्या अंकित जाधव, सुहास ठाकूर, मिलिंद मोरे आणि अमित अडखळे या चार तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केला. त्यांना अडवू पाहणा-या एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केला. या चार तरुणांवर विनयभंग आणि तरुणाच्या खुनाच्या प्रयत्न करण्याचा गुन्हा ठाणे पोलिसांनी दाखल केला. त्यानंतर तक्रारदारांशी आम्ही तडजोड केली असून आमच्या विरोधातील खटला रद्द करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.