चीनमध्ये जहाज बुडाले, ४०० जण बेपत्ता

दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगजी नदीत सोमवारी रात्री पर्यटकांना घेऊन जाणारे ‘इस्टर्न स्टार’ जहाज वादळामुळे बुडाले. जहाजावर ४५८ प्रवासी असून आत्तापर्यंत १० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.

चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील नानजिंग शहरापासून चाँगकिंग शहराकडे हे जहाज जात होते. या जहाजातून ४५८ प्रवासी प्रवास करत होते.

वादळामुळे जहाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य तत्काळ राबविण्यात आले. मात्र सोसाट्याचे वारे आणि पाऊस अशा खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

यातील काही पर्यटक पोहत किना-यावर आले, तर काही जणांना मच्छिमारांनी वाचविले आहे. मात्र अद्यापही ४०० जण बेपत्ता असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *