देशातील भ्रष्टाचार संपवण्याच्या घोषणा करत सत्तेवर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीविरोधात परिवहन अधिकाऱ्यांना लाच दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्य सचिव उमेश सहगल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच त्यांच्या मुलीनं लाच दिल्याचं उघड झाल्यानं केजरीवाल अडचणीत आले आहेत.
आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यापासून दिल्लीतील भ्रष्टाचार ८० टक्के कमी झाल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री केजरीवाल भ्रष्टाचार मुक्ततेचे दाखले देत आहेत. अशाच एका कार्यक्रमादरम्यान आपल्या मुलीनं ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओ अधिकाऱ्यांची प्रामाणिकता तपासण्यासाठी आपण स्वत:च मुलीला तसं करण्यास सांगितल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.
केजरीवालांच्या या कृतीवर आक्षेप घेत सहगल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला पत्र लिहिले आहे. सहगल यांनी आपल्या पत्रातून केजरीवालांच्या वक्तव्याची चौकशीबरोबरच त्यांच्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.