कांदिवली-दामूनगरची मिरकरवाडा बंदर येथे पुनरावृत्ती!

कांदिवली-दामूनगरची मिरकरवाडा बंदर येथे पुनरावृत्ती!

कांदिवली-दामूनगर येथे झालेल्या सिलिंडर स्फोटाची पुनरावृत्ती रत्नागिरी मिरकरवाडा बंदर येथे घडली. मिरकरवाडा बंदरावरील झोपडपट्टीत रविवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर आग लागली. या आगीत बंदरावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्टीतील चार सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाले. वेगवान वा-यामुळे अवघ्या काही सेकंदांत आगीचा पसारा वाढला. रहिवासी भागापर्यंत आग पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता, परंतु नगर परिषदेसह फिनोलेक्सच्या अग्निशमन बंबासह स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या धर्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत मिरकरवाडा बंदरातील १५ झोपडय़ा जळून खाक झाल्या असून; सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी मिरकरवाडा बंदराशेजारी असलेल्या झोपडपट्टीतील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर झोपडपट्टीत आग पसरली. या आगीत झोपडपट्टीतील चार सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाला आणि आगीचा पसारा आणखी वाढला. अचानक लागलेल्या आगीमुळे मिरकरवाडा बंदरावर एकच धावपळ उडाली. आग विझवण्यासाठी प्रत्येक जण मदत करण्यात गुंतला. वा-यामुळे आगीचा फैलाव वाढल्याने आग विझवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेसह फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले.

मिरकरवाडा बंदरावरील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, सिलिंडरचे काही तुकडे बंदरवर उभ्या मच्छीमारी नौकांच्याजवळ पडले. तर काही तुकडे दोनशे फुटांवरील वस्तीत जाऊन पडले. एका झोपडीने पेट घेताच त्या झोपडीच्या बाजूला असलेल्या झोपडय़ाही या आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. या झोपडय़ांत असलेले सिलिंडर टप्प्याटप्प्याने फुटले. वा-याचा वेग अधिक असल्याने आगीचा पसारा अवघ्या काही सेकंदांत वाढला. स्थानिक नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेसह फिनोलेक्सच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले.

रत्नागिरी नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा साडेदहा वाजता घटनास्थळी पोहोचली. नगर परिषदेपाठोपाठ फिनोलेक्स कंपनीचा बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला. बंबाच्या मदतीने झोपडय़ांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथकही मिरकरवाडय़ात दाखल झाले. अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचा-यांसह स्थानिक नागरिकांनी तब्बल तासभर केलेल्या मेहनतीनंतर झोपडपट्टीला लागलेली आग विझवण्यात यश आले.

जीवितहानी टळली
मिरकरवाडा बंदरावर उभारण्यात आलेल्या झोपडय़ांत मासेमारी नौकांवरील खलाशी वास्तव्य करतात. या झोपडय़ांत राहणारे खलाशी शनिवारीच राजापूर तालुक्यातील ऊर्ससाठी गेले होते. आग लागली त्या वेळी झोपडय़ा रिकाम्याच होत्या त्यामुळे जीवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *